पुणे जिल्ह्यात शेतकरी – गुऱ्हाळचालक ऊसदरावरून आमने-सामने, शेतकऱ्यांची प्रति टन ४५०० रुपयांची मागणी

पुणे : जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये उसाला गुऱ्हाळ चालकांकडून प्रतिटन ४५०० रुपये दर मिळावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी एकत्र येऊ लागले आहेत. दुसरीकडे, गुऱ्हाळ व्यवसायात वाढता खर्च, तसेच बाजारभावातील चढ-उतारामुळे ४५०० रुपये दर देणे परवडत नसल्याची भूमिका गुऱ्हाळचालकांनी घेतली आहे. यावरून शेतकरी आणि गुऱ्हाळचालकांत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये उसाला ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. गुऱ्हाळचालकांनीही आपल्या व्यवसायाचे गणित मांडत बैठका सुरू केल्या आहेत. साखर कारखान्यांच्या तुलनेत गुऱ्हाळ व्यवसायाची उत्पादन पद्धत आणि खर्च वेगळा असल्याने ४५०० रुपये दर देणे सध्या परवडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या साधारण ३५०० रुपये प्रतिटन दर देणेच शक्य असल्याची भूमिका गुन्हाळचालकांनी घेतल्याची चर्चा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दौंड तालुक्यातील गुऱ्हाळचालकांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, साखर कारखान्यांमध्ये उसापासून साखरेबरोबरच विविध उपपदार्थ तयार केले जातात. त्यातून कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्याउलट गुऱ्हाळामध्ये प्रामुख्याने उसाचा रस काढून त्यापासून गूळ तयार केला जातो. त्यामुळे कारखान्यांच्या तुलनेत गुऱ्हाळ व्यवसायाचे आर्थिक गणित वेगळे असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. तसेच गुळाचा बाजार स्थिर नसल्यामुळे भविष्यातील विक्रीचा ठोस अंदाज घेणे कठीण होते.

प्रतिटन ऊस गाळपासाठी वाहतुकीसह सुमारे १८०० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे गुऱ्हाळचालकांकडून सांगितले जात आहे. याशिवाय गूळ बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी पुन्हा वाहतूक व इतर खर्च करावा लागतो. त्यामुळे ४५०० रुपये दर देणे सध्याच्या परिस्थितीत परवडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थितीत साधारण ३५०० रुपये प्रतिटन दर दिल्यास गुऱ्हाळ व्यवसाय चालवणे शक्य होईल, अशी भूमिका गुऱ्हाळचालकांनी घेतली असल्याचे समजते. एकीकडे शेतकरी ४५०० रुपयांच्या ऊसदरासाठी एकजूट होत असताना दुसरीकडे गुऱ्हाळ चालकही आपल्या व्यवसायाच्या गणितासाठी संघटित होत आहेत. त्यामुळे ऊसदराचा हा प्रश्न सुटणार कसा ? याकडे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here