शेतकऱ्यांचे महामार्ग रोको आंदोलन स्थगित; ३१ तासांनंतर वाहतूक सुरू, आता साखर कारखान्यांना घेराव घालणार : राजू शेट्टी

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन तब्बल ३१ तासांनंतर बुधवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्गावरील आंदोलन मागे घेत असून, आता साखर कारखान्यांना घेराव घालून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. त्यांच्या घोषणेनंतर सायंकाळी ६.३० वाजता शेतकऱ्यांनी टोलनाक्यांवरील ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. दरम्यान, कोगनोळी नाक्यावरील आंदोलक शेतकरी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या दिशेने रवाना झाले, तर हत्तरगी नाक्यावरील शेतकरी हुबळीच्या दिशेने निघाले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करण्याची तयारीही आंदोलकांनी दर्शवली.

आज कृष्णा कारखान्यावर धडक

ChiniMandi WhatsApp Channel

गुरुवारी सकाळी रेठरे येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर धडक देण्यात येणार असून, त्यानंतर परिसरातील साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडण्यासाठी आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली.आंदोलकांना संबोधित करताना शेट्टी म्हणाले की, महामार्ग रोको आंदोलनामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली. विशेषतः कंटेनर आणि अवजड वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची आणखी गैरसोय होऊ नये, यासाठी महामार्गावरील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर शेतकरी पुन्हा कोगनोळी येथे एकत्र येऊन आंदोलन छेडतील, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. महामार्गावरील आंदोलन स्थगित झाले असले, तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत साखर कारखान्यांविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here