सोलापूर : जिल्ह्यातील २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम संपून जवळपास तीन महिने उलटून गेले असतानाही शेतकऱ्यांना तब्बल २१७ कोटी ४८ लाख रुपयांची एफआरपी अद्याप मिळालेली नाही. या गंभीर प्रश्नाकडे ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी मुंबई मंत्रालयातील बैठकीत मुख्य सचिव राजेश कुमार अग्रवाल यांचे लक्ष वेधत निवेदन सादर केले. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील गाळप हंगाम, साखर उतारा आणि एफआरपीच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रा. पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील थकीत एफआरपीचा मुद्दा ठळकपणे मांडत संबंधित साखर कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनानुसार, जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांपैकी २३ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी अदा केली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ नुसार साखर कारखान्यांनी १४ दिवसांच्या आत एफआरपी अदा करणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवश्यक असते. त्यामुळे थकीत एफआरपीसह व्याजाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी प्रा. सुहास पाटील यांनी केली आहे. दरम्यान, चालू गाळप हंगामात कारखान्यांनी जाहीर केलेला दर आणि एफआरपी मिळून जवळपास ३६० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी लवकरच संघटित आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशाराही प्रा. पाटील यांनी दिला.


















