कोल्हापूर : अनेकवेळा शेतकरी रोपवाटिकांमधून रोपे आणतात आणि ऊस लागवड केली जाते. मात्र, काहीवेळा रोप वाटिकांमधून निकृष्ट बेणे पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते. या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः बेणे मळा तयार करण्याची गरज आहे. अगदी १ ते ५ गुंठ्यांचा नियोजनबद्ध बेणे मळा स्वतः तयार केल्याने रोगमुक्त, दर्जेदार बेण्याची उपलब्धता निश्चित होते. पारंपरिक पद्धतीमध्ये बेणे तोडणी, भरणी, वाहतुकीवर होणारा अधिकचा खर्च कमी होतो, वेळ वाचतो. दूरवरून रोपे आणताना वाहतुकीदरम्यान आणि लागणीदरम्यान खर्च होणारा पैसा, वेळ वाचतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊतिसंवर्धित रोपांपासून बेणेमळा तयार करण्यावर भर द्यावा असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे. मांजरी-पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील उतिसंवर्धन विभागातील महेश कोव्हाळे आणि शुभम पाटील आणि डॉ. ए. डी. कडलग यांनी उतिसंवर्धित रोपांपासून तयार बेणे किमान ४ वर्षे शाश्वत उत्पादन देऊ शकते असे सांगितले.
शास्त्रज्ञांनी सागितले की, उतिसंवर्धित रोपे ही सशक्त व निरोगी असतात. या रोपांपासून बेणे निर्मिती आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते. पारंपरिक बेणे मळ्यापेक्षा दोन ते अडीच पट अधिक बेणे मिळते. शंभर उतिसंवर्धित रोपांपासून एक गुंठा बेणे मळा तयार करून दहा महिन्यानंतर दोन डोळा टिपरी पद्धतीने एक एकर क्षेत्राची लागवड होते. उतिसंवर्धित ऊस रोपांपासून केलेला बेणेमळा हा निरोगी व उच्च प्रतीची दर्जेदार असल्यामुळे एक डोळा ऊस रोपे ही अडीच पट जास्त तयार होतात. येण्याची उगवण लवकर होते, त्यामुळे लवकर रोपे तयार होतात. उगवण क्षमता ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे खर्चात बचत होते. उत्पादन खर्च कमी होतो, दर्जेदार रोपांमुळे चांगले उत्पादन मिळते. अधिक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काटेकोर शेतीकडे वाटचाल करत असताना उच्च दर्जेदार वेण्याची जोड देणे आवश्यक आहे.
याबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले की, उतिसंवर्धित रोपे ही अप्रांकुराच्या मूळ पेशीपासून बनवली जातात. त्यानंतर ही रोपे प्रयो गशाळेमध्ये दर महिन्याला एक वेळा असे एकूण सात वेळा वाढवली जातात. ही रोपे तयार होण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे या रोपांची मागणी चार महिने अगोदर करावी. ही रोपे योग्य वयात, योग्य वेळी शेतात लावावीत. तरच चांगले दर्जेदार बेणे तयार होते. शेतकरी आणि साखर कारखान्यांनी किमान ४ ते ५ महिने आधी मागणी नोंदवून रोपे आरक्षित करावी. प्रत्येक साखर कारखान्याने दरवर्षी कमीत कमी प्रत्येक ऊस वाणाची दोन एकरांमध्ये उतिसंवर्धित रोपांपासून बेणेमळा करावा. उतिसंवर्धित बेणे असल्यास एकरी सरासरी १० टन याप्रमाणे उत्पादन वाढेल. यातून १,६०,००० टन अतिरिक्त ऊस तयार होईल, साखर उतारा ०.१ टक्क्याने वाढेल. त्याचप्रमाणे साखर, मळी, कोजनरेशन, मोलॅसेस आणि इथेनॉल अशा उपपदार्थांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. अक्कलकोट येथील शिवकुमार सोडे यांनी व्हीएसआयमधील तज्ज्ञांच्या मार्गगदर्शानुसार नियोजन केले. त्यातून चांगला फायदा होत असल्याचे ते सांगतात. उतिसंवर्धित रोपे सशक्त, निरोगी असतात. अशा रोपांपासून तयार केलेले बेणे वापरल्यास कीडनाशकांचा वापर कमी प्रमाणात करावा लागतो. या रोपांपासून बेणे निर्मिती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते असा सल्ला त्यांनी दिला आहे.


















