नवी दिल्ली: कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) मध्य प्रदेशातील जीआय टॅगधारक रीवा सुंदरजा आंब्याची पहिली व्यावसायिक निर्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे यशस्वीपणे केली आहे. या निर्यातीमुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत अधिक दर मिळाला आहे.वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी रीवा सुंदरजा आंब्याची एक मेट्रिक टन खेप यूएईला पाठविण्यात आली. या निर्यात प्रक्रियेत एपीडाने महत्त्वाची भूमिका बजावली.
स्थानिक बाजारात रीवा सुंदरजा आंब्याला प्रति किलो 100 ते 110 रुपये दर मिळत असताना निर्यातदाराने शेतकऱ्यांकडून प्रति किलो 150 रुपये दराने आंब्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति किलो 40 ते 50 रुपयांचा अतिरिक्त लाभ झाला असून, निर्यात साखळीत सहभागी झाल्याचा थेट आर्थिक फायदा त्यांना मिळाला आहे. या खेपेत रीवा जिल्ह्यातील गोविंदगड येथील प्रगतिशील शेतकरी सोनू गुप्ता आणि सेंधा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्याकडून खरेदी केलेले उच्च दर्जाचे जीआय टॅगधारक रीवा सुंदरजा आंबे समाविष्ट होते. या आंब्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि पॅकिंग उत्तर प्रदेशातील भदोही येथील एपीडाच्या सहकार्याने उभारलेल्या पॅक हाऊसमध्ये करण्यात आले. त्यानंतर वाराणसी येथून हवाई मार्गाने ही खेप यूएईला पाठविण्यात आली.
गोड चव, समृद्ध सुगंध, तंतुमुक्त गर आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वाद यासाठी प्रसिद्ध असलेल्या रीवा सुंदरजा आंब्यामध्ये मोठी निर्यात क्षमता आहे. या निर्यातीमुळे या देशी आंब्याच्या जातीला जागतिक स्तरावर ओळख मिळण्याबरोबरच मध्य प्रदेश प्रीमियम आंबा निर्यातीचे उदयोन्मुख केंद्र म्हणूनही पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.एपीडाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून मध्य प्रदेश उद्यानिकी विभाग, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), पॅक हाऊस संचालक आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांच्या सहकार्याने या निर्यातीसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात आली होती.


















