सांगली : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने म्हैसाळ येथील एका वाहतूकदाराची ३५ लाख २७ हजार रुपयांची फसवणुकीची घटना घडली आहे. याप्रकरणात बीड जिल्ह्यातील चार मुकादमांविरोधात ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल मारुती टाकळे (वय ४१, रा. जैनबस्ती जवळ, म्हैसाळ, ता. मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टाकळे हे कारखान्यास ट्रॅक्टरने ऊसपुरवठा करणारे वाहतूकदार आहेत.
विनोद शांताराम भिल, जोतीराम गोपीचंद भिल, मोतीलाल गोपीचंद भिल, आणि वसंत राजघर भिल (सर्व रा. टिखी, ता. जि. धुळे) हे ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम आहेत. या चौघांनी अमोल टाकळे यांना ट्रॅक्टरसाठी ऊसतोड मजूर आणून देण्याचे आश्वासन देऊन रकमा घेतल्या. २० फेब्रुवारी २०२५ पासून आजअखेर, विनोद शांताराम भिल यांनी ७ लाख ४१ हजार ३०० रुपये, जोतीराम गोपीचंद भिल यांनी ७ लाख ६७ हजार रुपये, मोतीलाल गोपीचंद भिल यांनी ६ लाख ५१ हजार ७००, वसंत राजघर भिल यांनी १३ लाख ६७ हजार रुपये असे एकूण ३५ लाख २७ हजार रुपये घेतले. मात्र, मजूर उपलब्ध करून न देता टाकळे यांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.


















