अहिल्यानगर : हिरडगाव येथील गौरी शुगर डिस्टिलरीज प्रा. लि. (ओंकार शुगर, युनिट-४) कारखान्याने गेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये दराने पेमेंट अदा केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट आठव्या दिवशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच दिवाळीपूर्वी प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त रक्कम आणि दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर देण्यात येणार असल्याची ग्वाही ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
हिरडगाव येथील गौरी शुगरच्या चौथ्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन व गाळप हंगाम शुभारंभसोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याच्या संचालक रेखा बोत्रे पाटील आणि ओमराजे बोत्रे पाटील यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. बाबुराव बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगात मोठी झेप घेतली असून, आज समूहाचे ३५ साखर कारखाने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत समूहाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी एक रुपयाही घेतलेला नाही, तसेच शासनाकडून कोणतीही विशेष सवलत मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीतील घटकांनी टीका करताना वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन आणि गाळप कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीतही अहिल्यानगर जिल्ह्यातील गौरी शुगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्यासह ऊस वाहतूकदारांचे पेमेंटही आठव्या दिवशी त्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. शेतकरी आणि वाहतूकदारांना वेळेत पैसे मिळावेत, यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण फराटे यांनी केले.
यावेळी टिळक भोस आणि नवनाथ शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कारखान्याच्या संचालक रेखा बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील, उद्योग समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, सचिन चौधरी, संतोष दरेकर, कुंडलिक बनकर, भूषण बडवे तसेच सरव्यवस्थापक वसंत जरमळ यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले. नवनाथ दरेकर यांनी आभार मानले.


















