सरकारने साखर उद्योगाला आर्थिक अडचणीतून वाचविण्यासाठी ‘एमएसपी’ वाढवावी : छत्रपती कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक

पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये गुरुवारी (ता.१८) कारखान्याच्या मिल रोलर पूजन संचालक अनिल काटे व सतीश देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये १२ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती दिली. अध्यक्ष जाचक यांनी “साखर उद्योग आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर असून त्यात अपेक्षित वाढ होत नाही. केंद्र शासनाने उसाच्या एफआरपीबरोबरच साखरेची एमएसपी वाढविणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.

अध्यक्ष जाचक म्हणाले की, येत्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावरील उसाची नोंद झाली आहे. गळीत हंगामामध्ये कारखाना प्रतिदिन आठ हजार टन व त्यापेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. कारखाना आगामी गळीत हंगामातील पहिला हप्ता इतर कारखान्यांच्या बरोबरीने देणार आहे. जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी एक चांगली योजना संचालक मंडळ तयार करीत आहे. जाचक यांनी साखर निर्यात थांबल्यामुळे साखरेचा अतिरिक्त साठा निर्माण होऊन दर घसरण्याची भीती आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here