योग्य ऊस दराच्या मागणीसाठी गुरुवारी साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन : जय शिवराय किसान संघटना

कोल्हापूर : यंदा पावसामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, अशा परिस्थितीत घाईने गाळप सुरू केल्यास शेतकरी आणि कारखान्यांचे नुकसान होईल. त्यामुळे कारखाने उशीरा सुरू करावेत. तसेच साखर कारखान्यांमधील ऊस वाहतूक अंतराची अट २५ किलोमीटरवरून कमी करून प्रत्यक्ष अंतरानुसार वाहतूक दर आकारावा आणइ उसाला योग्य दर मिळावा या मागण्यांसाठी शरद जोशी विचार मंचच्यावतीने गुरुवारी (ता. ८) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

माने म्हणाले की, साखरेचा किमान विक्री मूल्य (एमएसपी) ५५ रुपये करावा, साखरेचे दर द्विस्तरीय करावेत, आरएसएफ अहवाल न देणाऱ्या आणि थकीत एफआरपीवरील व्याज न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. वजन काट्यांमध्ये पारदर्शकता आणावी, तसेच मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, ऊस वाहतूक दर अंतरानुसार आकारावा आणि शेतकऱ्यांना योग्य ऊसदर द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here