बेळगाव (कर्नाटक) : सहकारी तत्त्वावरील अनेक संस्था आर्थिक अडचणीत असतानाही गतवर्षी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याने ५४९ रुपये प्रति टन जादा दर वेळेत दिला आहे. यंदा कारखान्याने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासद, शेतकऱ्यांनी ऊस हिरण्यकेशीलाच पाठवून अप्पणगौडा पाटील यांनी उभा केलेला हा कारखाना टिकवावा, असे आवाहन अध्यक्ष बसवराज कल्लटी यांनी केले. ते हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या वार्षिक सभेत बोलत होते.
उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी यांनी स्वागत केले. कल्लटी म्हणाले, यंदाच्या हंगामात कार्यक्षेत्रात ६९,७१५ एकर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून अकरा लाख क्विंटल साखर उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. गत हंगामात सभासदांना प्रतिकिलो १७ रुपये दराने ५० किलो साखर वाटप केली आहे. कर्मचारी, सभासदांना विमा संरक्षण दिले आहे. प्रतिटन एक हजार रुपयेप्रमाणे कंपोस्ट खत सभासदांना देऊन सहकार्य केले आहे. या सर्व योजना यावर्षीच्या हंगामातीही कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिस्टिलरी घटकातून गतवर्षी कारखान्याला दहा कोटींवर नफा झाला आहे.
कार्यालयीन अधीक्षक सुभाष नासीपुडी यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी यांनी स्वागत केले. बसवराज पाटील, भीमगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक अप्पासाहेब शिरकोळी, मल्लिकार्जुन पाटील, बसवराज मर्डी, प्रभूदेव पाटील, सुरेंद्र दोडलिंगन्नावर, शिवनाईक नाईक, बाबासाहेब आरबोळे, अशोक चचंदपगोळ, व्यवस्थापकीय संचालक महादेवस्वामी डी. एस., शंकर हेगडे, गुरू पाटील, डॉ. जयप्रकाश करजगी, जयगौडा पाटील, मलगौडा पाटील, अण्णप्पा हिटणी आदी मान्यवरांसह सभासद उपस्थित होते.


















