कोल्हापूर : भारत हा जगातील गूळ उत्पादनामध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाटा असलेला अग्रगण्य देश ठरला आहे. देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी सुमारे 20 ते 30 टक्के ऊस गूळ निर्मितीसाठी वापरला जातो. या उद्योगामुळे जवळपास 25 लाख ग्रामीण नागरिकांना रोजगार आणि उपजीविका मिळत आहे. पीआयबीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2015-16 ते 2024-25 या कालावधीत गुळाच्या निर्यात मूल्यात तब्बल 106.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय गुळाची मागणी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोह, खनिजे आणि आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वांनी समृद्ध असलेला गूळ हा परिष्कृत साखरेचा आरोग्यदायी पर्याय मानला जातो. गुळाला “औषधी साखर” असेही संबोधले जाते. ऊसाच्या रसापासून कोणतेही रसायन न वापरता पारंपरिक पद्धतीने त्याची निर्मिती केली जाते. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नैसर्गिक गोड पदार्थांकडे ग्राहकांचा वाढता कल आणि रसायनमुक्त उत्पादनामुळे गुळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण योजना आणि ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यांसारख्या योजनांमुळे देशात गूळ उद्योगाला मोठा आधार मिळत आहे. तसेच जीआय टॅगिंगमुळे मूल्यवर्धन, ग्रामीण उद्योगांचे बळकटीकरण आणि निर्यात वाढीस मदत होत आहे.
2024-25 मध्ये भारतातील ऊस उत्पादन 444.9 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचा 48.5 टक्के वाटा असून त्यानंतर महाराष्ट्राचा 24.1 टक्के आणि कर्नाटकाचा 10.5 टक्के वाटा आहे.2015-16 मध्ये भारतातून 292.8 मेट्रिक टन गुळाची निर्यात झाली होती, ज्याचे मूल्य 197 दशलक्ष अमेरिकी डॉलर होते. 2024-25 मध्ये ही निर्यात वाढून 471.9 मेट्रिक टनांवर पोहोचली असून तिचे मूल्य 406.8 दशलक्ष अमेरिकी डॉलर झाले आहे. इंडोनेशिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया आणि नेपाळ हे भारतीय गुळाचे प्रमुख आयातदार देश ठरले आहेत.
नैसर्गिक गोड पदार्थांची मागणी वाढली
2021 ते 2024 या काळात गूळ आणि मध या नैसर्गिक गोड पदार्थांच्या बाजारात 15 ते 20 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत देशांतर्गत बाजारात गुळाची वार्षिक विक्री सुमारे 5,000 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे.भारतामध्ये अनेक गूळ प्रकारांना भौगोलिक संकेत (GI) मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्रातील ‘कोल्हापुरी गूळ’ हा त्याच्या सोनेरी रंग आणि उच्च सुक्रोज प्रमाणासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर गूळ निर्यातक्षम गुणवत्तेसाठी ओळखला जातो. तर केरळमधील मरायूर आणि मध्य त्रावणकोर गूळ त्यांच्या पारंपरिक प्रक्रिया पद्धती आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत.


















