पुणे: रंग किंवा साखरेची भेसळ न करता पारंपरिक पद्धतीने गुळाचे उत्पादन सुरू झाल्याने बाजारात गुळाची आवक वाढू लागली आहे. मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात गुळाची आवक वाढली असली, तरी ती मागणीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात घाऊक बाजारात गुळाच्या भावात किलोमागे दीड ते दोन रुपयांची वाढ झाल्याची माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.
बाजारात मागणी वाढल्याने साखर आणि गव्हाच्या भावातही किलोमागे प्रत्येकी एक रुपयांची वाढ झाली आहे. साखर प्रतिक्विंटल ४२५०-४३०० ने विकली जात आहे. शेंगदाण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्याच्या दरात किलोमागे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, मार्केट यार्डातील भुसार बाजारात अद्याप अपेक्षित प्रमाणात ग्राहकांची गर्दी नसल्याने व्यवहार संथ आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील आठवड्यात शहरात वारीचे आगमन होणार असल्याने बाजारातील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर श्रावण महिन्यातील सण-उत्सवांमुळे किराणा मालाच्या मागणीत आणखी वाढ होऊन बाजारातील व्यवहारांना वेग येण्याची अपेक्षा आहे.

















