जालना : उन्हाचा तडाखा आणि पाण्याचा तुटवडा यामुळे शेतातील उभा ऊस आता डोळ्यांदेखत वाळत चालला आहे. निसर्गाने आधीच छळले असताना साखर कारखान्याकडून त्रास होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस तोडणीचा अधिकृत नंबर येऊनही कारखान्यांचे अधिकारी ऊसतोडणीस तुम्ही मूळ सभासद नाही, अशी अनेक प्रकारचे कारणे देऊन टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. वाळत असलेला ऊस तातडीने कारखान्याला नेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी भावनिक मागणी हवालदिल शेतकऱ्यांनी केली आहे. आम्ही मूळ सभासद नसलो तरी लाभार्थी सभासद असतानाही आमच्यावर हा अन्याय का? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होते.
अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करून ऊस जगवला. मात्र, ऊस कारखान्यात गाळप व्हावा यासाठी त्यांना कारखान्याचे संचालक आणि अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कारखान्यांकडून अशी वागणूक का दिली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे म्हणाले की, तोडणी नियोजनाबाबत कारखान्यांविरोधात तक्रारी येत आहेत. मनमानी पद्धतीने तोडणी कार्यक्रम राबविला जात असून, हे खपवून घेतले जाणार नाही. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये.
समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांगितले की, समृद्धी साखर कारखाना संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पाणी नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्याने तोड देण्यात येत आहे. धाकलगाव परिसरात मी स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पाण्याअभावी ऊस वाळत असलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यांना तातडीने तोड देण्यात येईल.


















