जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह गोदावरी परिसराची उसाचा पट्टा म्हणून ओळख आहे. दरवर्षी या भागात अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न असतो. कार्यक्षेत्रात तीन कारखाने, एक गूळ उद्योग असूनही दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून कारखाने या परिसरात टोळ्या टाकतात व अतिरिक्त ऊस घेऊन जातात. यामुळे कारखान्यांनी नाकारलेला, नोंद न घेतलेला, विविध कारणांनी अडवणूक होत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुऱ्हाळचालकांकडून आधार दिला जातो. यंदाही अशीच परिस्थिती असून परिसरातील दोन गूळ उद्योगासह एका गूळ पावडर उद्योगाने दोन हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. अडीच हजार क्विंटल गूळ तयार झाला असून, ५०० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
यावर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर दुसरीकडे वाळलेल्या उसाच्या पिकाला गुऱ्हाळ आणि गूळ उद्योगाकडून दिलासा मिळत आहे. पाण्याअभावी उभा ऊस वाळत आहे. हा ऊस लवकर जाण्यासाठी शेतकरी कारखान्यांची विनवणी करीत आहेत, दुसरीकडे गुऱ्हाळांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. कमी कालावधीचा, अपरिपक्व झालेला ऊस त्याचप्रमाणे पाण्याअभावी वाळलेल्या उसाला गुऱ्हाळाकडून प्राधान्य दिले जात आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडका येथील सागर गुळ उद्योगाचे प्रमुख शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की, यावर्षी दोन महिने अगोदरच गुऱ्हाळ सुरू केले आहे. रोज २० टन उसाचे गाळप केले जात आहे. आतापर्यंत एक हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, अकराशे क्विंटल गूळ तयार केला आहे. सध्या शंभर ते दीडशे मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर नाथनगर येथील ज्ञानेश्वर गुळ उद्योगाचे प्रमुख राम मुरुमकर यांनी ऊस परिपक्व नसल्याने उतारा कमी येत असल्याचे सांगितले.


















