जालना : घनसावंगी तालुक्यात ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. यंदाही चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली होती. मात्र, उन्हाळा संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांवर पाण्याचा तीव्र ताण निर्माण झाला आहे. जमिनीतील ओलावा पूर्णपणे निघून गेल्याने उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक गावांमध्ये बोअर, विहिरींनी अक्षरशः तळ गाठला आहे. काही ठिकाणी मोटार सुरू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पाणी संपत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. जून महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी पाऊस न झाल्याने शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस पिक करपू लागले आहे.
घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी उसाच्या पानांचा रंग बदलू लागला असून अनेक शेतांमध्ये पाने पिवळी पडून वाळत आहेत. काही भागात ऊसाची वाढ खुंटली असून कांड्यांची जाडीही कमी होत असल्याचे चित्र आहे. ऊस पिकाला आवश्यक असलेले पाणी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी लाखो रुपयांचा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर सुकत असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. अनेक विहिरी कोरड्या पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. ज्यांच्याकडे काही प्रमाणात पाण्याची सुविधा आहे ते शेतकरीही मर्यादित क्षेत्राला पाणी देत आहेत. पुढील काही दिवसांतही पाऊस झाला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तविली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस होणे अत्यावश्यक बनले आहे. तालुक्यात करपत चाललेली ऊस पिके आणि आटत चाललेले जलस्रोत ही चिंतेची बाब ठरत आहे. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी विठ्ठलराव घोगरे म्हणाले की, विहिरीतील पाणी झपाट्याने कमी होत असून ऊसाला वेळेवर पाणी देणे कठीण झाले आहे. कडक उन्हामुळे ऊसाची पाने पिवळी पडून करपू लागली आहेत.


















