जालना : उसाला ४५ कांडे, वजन सरासरी साडेचार किलो, प्रगतशील शेतकऱ्याला मिळाला ‘एआय’ तंत्रज्ञानाचा आधार

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट एक व दोन यांच्या वतीने तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित ऊस पीक परिसंवादात अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी रणजित शंकरराव गुजर यांनी ‘एआय’ आधारित खत व्यवस्थापनाचा वापर करून ८६०३२ जातीचा ऊस प्रात्यक्षिकांसाठी ठेवण्यात आला होता. या उसाला ४५ कांडे असून, एका उसाचे वजन सरासरी साडेचार किलो आहे. एकरी ११० टन उतारा अपेक्षित आहे. गुजर परिसरात नेहमीच उसाचे चांगले उत्पन्न घेतात. उसाच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खत, पाणी, व्यवस्थापन, हवामानाचा अचूक अंदाज, रोग व कीड नियंत्रण, ड्रोनद्वारे फवारणी, कमी खर्चात जास्त उत्पन्न पद्धतीचा उपयोग करून जास्तीत जास्त एकरी उत्पादन वाढवण्याकडे त्यांचा कल आहे.

माजी मंत्री राजेश टोपे, अध्यक्षा डॉ. दिशा टोपे, उपाध्यक्ष उत्तमराव पवार, व्यवस्थापकीय संचालक बी.टी. पावसे, कार्यकारी संचालक आर.ए. समुद्रे, एस.व्ही. पाटील यांच्या सह व्हीआयएस, एआय प्रकल्प प्रमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीतज्ज्ञ यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ऊस पिक परिसंवाद झाला. रणजित गुजर यांनी आपल्या आठ एकर क्षेत्रात एआयच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ८६०३२ या जातीच्या उसाची आडसाली लागवड केली असल्याची माहिती दिली. यावेळी घनसावंगी तालुक्यात पिंपरखेड बुद्रुक, कुंभार पिंपळगाव, मूर्ती, रामसगाव आदी गावांत २५ शेतकऱ्यांचा ग्रुप करून एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढवण्याकडे शेतकरी लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या विशेष प्रयत्नाने समर्थ सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here