जालना : जिल्ह्यात पाच साखर कारखाने आहेत. यामध्ये अंकुशनगर (ता. अंबड) येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना आणि तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील समर्थ युनिट-२ या दोन सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे, तर परतूर तालुक्यातील श्रद्धा एनर्जी अर्थात माँ बागेश्वरी साखर कारखाना, भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना आणि घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर्स या तीन कारखान्यांनीही गाळप हंगाम सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, ज्या ठिकाणी गतवर्षी एकरी ४५ ते ५० टन उसाचा उतारा मिळत होता, त्याच ठिकाणी एकरी १५ ते २० टनांपर्यंत उतारा आला आहे. त्यामुळे गाळपासाठी ५० टक्के ऊस कमी पडण्याची शक्यता आहे. शिवाय, उसाचा उतारा घटल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह कारखान्यांनाही बसेल.
दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, दरवर्षी साडेचार ते पाच महिने चालणारा ऊस गाळप हंगाम यंदा तीन महिन्यांत उरकण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्याने उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात पाच कारखान्यांसह घनसावंगी तालुक्यात गूळ पावडर कारखाना आहे. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर जाणवणार आहे. जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ३२ हजार ८१.५७ हेक्टरवर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस अंबड आणि घनसावंगी तालुक्यात आहे. ऊस टंचाईबाबत कर्मयोगी अंकुशराव टोपे कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, यंदा उसाचा मोठा प्रश्न आहे. दरवर्षी गाळप हंगाम १४५ दिवस नियमित चालतो. परंतु, यंदा ८० ते ९० दिवस गाळप हंगाम चालेल, असे चित्र आहे. कारखान्याच्या क्षमतेपेक्षाही कमी गाळप होण्याची शक्यता आहे. सध्या उसाचे एकरी उत्पादन १५ ते २० टन आहे. पाण्याअभावी ऊस वाळत असल्याने शेतकऱ्यांकडूनही कमी दिवसांचा ऊस घेऊन जाण्याचा आग्रह केला जात आहे. या उसाला साखरेचा उतारा खूप कमी मिळतो. सध्या सात टक्क्यांपर्यंत उतारा मिळत आहे.


















