बेळगाव : मंत्री लक्ष्मण सवदी यांच्याकडे सहकार मंत्रीपद देण्यात आले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्यासह कृषी कर्जाची उपलब्धता, शेतीच्या जमिनींचे मूल्यांकन, सहकारी बँकांचे आर्थिक बळकटीकरण, ठेवीदारांचा विश्वास मिळवणे अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. अलीकडच्या काळात ऊसदर, थकीत देणी आणि कारखान्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. राज्यातील २१ सहकारी साखर कारखान्यांपैकी आठ कारखाने आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी खासगी संस्थांना लीजवर किंवा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित कारखान्यांची आर्थिक स्थिती, वाढता तोटा, व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवनाचे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्याकडे सवदी यांना सहकारमंत्री म्हणून लक्ष द्यावे लागेल.
मंत्री सवदी यांच्या पाठीशी सहकार चळवळ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व याची जाण असलेला अनुभव आहे. त्यामुळे या खात्याकडून अपेक्षाही मोठ्या आहेत. सध्याच्या स्थितीत सहकारी बँका आणि पतसंस्थांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा सहकार क्षेत्राच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा भाग आहे. उत्तर कर्नाटकात सहकारी साखर कारखान्यांचे जाळे मोठे आहे. त्यांच्या प्रश्नांकडे सवदी यांना लक्ष द्यावे लागेल. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार वेळेत कर्ज मिळेल, यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे ही सवदी यांच्यासाठी मोठी संधीही आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका, संचालक मंडळांची स्थापना, कर्जवाटप आणि नियुक्त्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप अशा तक्रारींबाबत निर्णय घ्यावे लागतील. याबाबत सवदी यांनी सांगितले की, सहकार क्षेत्राची विश्वासार्हता कायम ठेवण्याबरोबरच सहकारी साखर कारखान्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यात येईल. राज्य सहकार अपेक्स बँकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन सहकारी संस्थांमध्ये लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य दिले जाईल.


















