कर्नाटक : १५३ कोटींपेक्षा अधिक कर्जाची परतफेड न केल्याने साखर कारखान्याचा ताबा घेण्यास न्यायालयाची बँकेस परवानगी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील मालप्रभा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने १५३ कोटींपेक्षा अधिक कर्जाची परतफेड न केल्यामुळे स्थानिक न्यायालयाने अपेक्स बँकेला कारखान्याचा प्रत्यक्ष (फिजिकल) ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायालय आणि मुख्य न्यायिक दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयाने अपेक्स बँकेने दाखल केलेल्या याचिकेला मान्यता देत हा आदेश दिला. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये बँकेने कारखान्याचा सांकेतिक (कन्स्ट्रक्टिव्ह) ताबा घेतला होता.

मालप्रभा सहकारी साखर कारखान्याने अपेक्स बँकेकडून घेतलेल्या दीर्घकालीन कर्जाची १५३.२३ कोटींची थकबाकी अद्याप फेडलेली नाही. याबाबत जुलै २०२५ मध्ये कारखान्यास नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये बँकेने सांकेतिक ताबा मिळवला, मात्र त्यानंतरही कर्जाची परतफेड करण्यात आली नाही. कर्जाची थकबाकी कायम राहिल्याने अपेक्स बँकेने बेळगाव न्यायालयात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने नुकतेच बँकेच्या बाजूने निर्णय देत कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास परवानगी दिली, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.या निर्णयामुळे आता बँकेला कायदेशीर प्रक्रियेनुसार कारखान्याच्या मालमत्ता आणि व्यवस्थापनावर प्रत्यक्ष नियंत्रण मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थकीत कर्ज वसुलीसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here