बेळगाव : काकती येथील मार्कंडेय साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संचालक मंडळाने केलेल्या विनंतीनुसार संचालक अविनाश पोतदार यांनी पुढाकार घेतल्यामुळे बंद अवस्थेत असलेल्या या कारखान्याला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही काळापासून कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस इतरत्र पाठवावा लागत होता. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता कारखाना सुरू होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखाना सुरू करण्याबाबत गुरुवारी (ता. १८) कारखान्याच्या परिसरात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्षपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्तच आहे.
गेल्या काही काळापासून कारखाना बंद असल्यामुळे सभासदांमध्ये नाराजी होती. मात्र, आता कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याने सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कारखाना सुरू होण्याच्या हालचालींमुळे शेतकरी, कामगार आणि सभासदांना दिलासा मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीस तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. सुरुवातीला तानाजी पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, त्यानंतर आर. आय. पाटील यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मात्र, त्यांनीही राजीनामा दिल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त आहे. सध्या उपाध्यक्ष म्हणून बसवंत मायाण्णाचे कार्यरत आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळात १५ सदस्य आहेत. अद्याप अध्यक्षपदाचा तिढा सुटलेला नाही. कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आल्यामुळे अध्यक्षपदाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















