बेळगाव : राज्यातील ऊस दर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी २५ ऑक्टोबरला गुर्लापूर येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी सुवर्णसौध येथे होणाऱ्या मुख्यमंत्री, साखर कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, यासाठी सोमवारी, दि. २६ रोजी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते चन्नाप्पा पुजारी यांनी दिला.
पुजारी म्हणाले की, साखर कारखानदारांनी प्रतिटन ४,५०० रुपये आणि राज्य सरकारने एक हजार रुपये अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकराने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ६० रुपये करावी आणि इथेनॉलची संपूर्ण खरेदीची हमी द्यावी या मागण्या आम्ही केल्या आहेत. साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना अपेक्षित ऊसदर देणे शक्य होईल. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारने मागण्यांवर योग्य निर्णय न घेतल्यास सुवर्णसौध येथून पुन्हा पदयात्रा काढून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पुजारी यांनी दिला.


















