बेळगाव : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी, जादा ऊस दरासाठी कर्नाटक राज्य रयत हसिरू सेनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी, गौरवाध्यक्ष शशिकांत गुरुजी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी कागवाड येथील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलमध्ये सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. तहसीलदार रवींद्र हादीमणी यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे केलेल्या आंदोलनावेळी स्थानिक शेतकरी नेते सुरेश चौगुले, वकील राहुल कटगेरी, निवृत्त मुख्याध्यापक एम. बी. उदगावी, अजित करव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. महिलांनीही सहभाग नोंदवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. कागवाडचे पोलिस पाटील काकासाब पाटील, रमेश चौगुले, कागवाड रयत संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील, विनायक चौगुले, शशिकांत गुमटे, आदिनाथ बिंदगे, अमीर शेख, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


















