बेळगाव : ऊस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रीय पद्धती, दर्जेदार बियाण्यांचा वापर, ठिबक सिंचन, माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन तसेच पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत शेतकऱ्यांनी नियोजन करावे. ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन अधिक उत्पादन मिळू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती पद्धती स्वीकारून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केएलई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. चिंचली येथे शिवशक्ती साखर कारखान्यातर्फे शुक्रवारी आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
डॉ. कोरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आधुनिक शेती पद्धतींचा अबलंब करणे ही काळाची गरज आहे. शिवशक्ती साखर कारखान्यातर्फे शेतकरीहित लक्षात घेऊन विविध कृषी विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण व अन्य सहाय्य उपलब्ध करून दिले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सभेपूर्वी डॉ. प्रभाकर कोरे यांनी चिंचली येथील आराध्यदैवत मायाक्का देवी मंदिरात जाऊन पूजा करून देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रमास चिदानंद कोरे कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे, अजित देसाई, मल्लाप्पा मैशाळे, नानासाहेब सौंदलगी, अंकुश जाधव, जितेंद्र जाधव, भीमशी किलारे, वसंत करकई, आर. बी. खंडगावे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


















