बेळगाव : राज्यात उसदराच्या प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रतिटन ५,५०० रुपये दर देण्याबरोबरच साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या प्रश्नावर ठोस तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. गुर्लापूर येथेही शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन कायम आहे. शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनाची तिव्रता वाढवत शेतकऱ्यांनी सोमवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासमोर जेलभरो आंदोलन केले. शेकडो शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलनांवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरी संघटनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे. विविध गावांमध्ये निदर्शन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी थेट हिंडलगा कारागृहासमोर धडक देत जेलभरो आंदोलन केले. ‘उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर दिलाच पाहिजे’, ‘साखरेची एमएसपी वाढवलीच पाहिजे’, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला. सायंकाळी उशिरापर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलनात सहभागी होण्यासाठी गुर्लापूर येथून आणखी मोठ्या संख्येने शेतकरी येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. पोलिसांनी कारागृह परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.


















