कर्नाटक : राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र सातत्याने वाढत असले तरी प्रतिएकरी उत्पादनात घट होत आहे. रोगांचा वाढता प्रादुर्भाव, एकाच पिकाची सतत लागवड, पीक फेरपालटीचा अभाव, निकृष्ट, शिफारस नसलेल्या जातींची लागवड, सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा ताण, अतिपाणी, अतिवृष्टी व पूरस्थिती यांसारख्या कारणांमुळे उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस पिकातील रोगांचे निदान व नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचबरोबर ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याने प्रयत्न चालवले आहेत.
कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे अधिकारी विश्वजीत पाटील यांनी सौंदलगा केंद्रातर्फे बेनाडीसह सौंदलगा, आडी परिसरातील शेतांची पाहणी केली. या पाहणीत पाटील यांनी काही शेतांमध्ये ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे सांगितले. ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश ऊस उत्पादक भागात आढळतो. लागवड केलेल्या बहुतांश ऊस जाती या रोगास कमी-अधिक प्रमाणात बळी पडतात. लागवड पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. रोगामुळे उसाची जाडी कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते. यासाठी शेतकऱ्यांनी रोगमुक्त बेण्याची निवड करावी. बियाणे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. को-८६०३२ व पीडीएन-१५०१२ यांसारख्या शिफारस केलेल्या जातींची लागवड करावी. ऊस पिकाची नियमित पाहणी करून रोगग्रस्त बेटे मुळासह उपटून जाळून नष्ट करावीत, असे आवाहन केले. यावेळी श्रीकांत चौगुले, अशोक पाटील, अशोक खोत, लखन बेळगे, सदाशिव कोगले, सुदेश राजहंस आदी उपस्थित होते.


















