बेळगाव : हालसिद्धनाथ कारखान्याचे कर्ज व ठेवी ११५० कोटीहून जास्त आहे. व्याजाचा खर्च १०० कोटीहून जास्त आहे. आम्ही कारखान्याच्या विकासाला कधीही विरोध केला नाही. संचालक मंडळाने सन २०१८ पासून आतापर्यंत विकासकामांचे ठराव एकमताने मंजूर केले आहेत. परंतु या विकासकामांसाठी भरमसाठ व्याजाने कर्ज घेऊन कारखाना कर्जाच्या खाईत ओढला जात आहे. कारखान्याचे मार्गदर्शक अण्णासाहेब जोल्ले यांनी कारखाना कसा कर्जमुक्त करणार याबाबत श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी कारखान्याचे संचालक व माजी चेअरमन सुकुमार पाटील-बुद्धीहाळकर यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संचालक सुकुमार पाटील म्हणाले की, निपाणी कोर्टाने साखर चोरीबाबत संचालक मंडळ व अधिकारी यांच्यावर रितसर तक्रार दाखल करून चौकशीचा आदेश दिला होता. पकडलेली ५०८४ पोती साखर व त्यावर भरलेला दंड याबाबत आपणास काहीही माहिती नव्हते. हा विषय कधीही संचालक मंडळासमोर आला नव्हता. यदेशीर सल्ला घेऊन आपण कोर्टाकडून जामीन घेतला आहे. दरम्यान, कारखान्याला कर्जाच्या खाईतून मुक्त करण्याची गरज असल्याचे सूर्यकांत पाटील यांनी सांगितल. यावेळी श्रीनिवास संकपाळ, अण्णासाहेब इंगळे, शरद पाटील, सुंदर पाटील, रघुनाथ चौगुले, दीपक ढनाल, चंद्रकांत माळी, अमृत ढोले, सुशांत खराडे यांची उपस्थिती होती.


















