बेळगाव : केंद्र सरकारने यंदा उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १०० रुपयांची वाढ करून ती ३६५० रुपये केली आहे. हा दर उत्पादन खर्चापेक्षा १००.५ टक्क्यांनी अधिक असून त्याचा लाभ देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांसह साखर उद्योगाशी संबंधित सुमारे पाच लाख कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. पण, या निर्णयाबाबत शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. खतांचे वाढलेले दर, मजुरी, कीटकनाशके आणि इतर खर्च लक्षात घेतल्यास एफआरपीतील १०० रुपयांची वाढ अपुरी असल्याचे मत व्यक्त होत आहे. एफआरपीतील ही वाढ महसूल विभागनिहाय ठरवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
केंद्र सरकार एफआरपी ठरवताना संपूर्ण देशाची सरासरी काढते. पण प्रादेशिक असमतोलामुळे प्रत्येक भागातील उत्पादन खर्च वेगळा असतो. त्यामुळे महसूल विभागनिहाय उत्पादन खर्च निश्चित करून एफआरपी ठरवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. गेल्या काही वर्षात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी त्याच प्रमाणात उत्पादन खर्चही वाढल्याचे दिसून येते. २०२६-२७ या वर्षासाठी उसाचा उत्पादन खर्च प्रतिटन १८२० रुपये गृहीत धरला आहे. हा खर्च अत्यंत कमी दाखवण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर, मजुरी, इंधनदरवाढ आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमती लक्षात घेतल्यास उत्पादन खर्च मोठ्याप्रमाणात वाढला असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. १८२० रुपयांत एक टन ऊस पिकवणे अशक्य असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे उसाची एफआरपी साखरेच्या किमान दराशी निगडित असणे आवश्यक असल्याचे मत साखर कारखानदारांनी व्यक्त केले आहे.


















