बेळगाव:येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच वर्षांसाठी अध्यक्षपदी एम. पी. पाटील व उपाध्यक्षपदी पवन पाटील यांची निवड झाली होती. दोघांचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नवी निवडणूक जाहीर केली होती. अध्यक्षपदासाठी जयकुमार आप्पासाहेब खोत (शमनेवाडी) आणि उपाध्यक्षपदासाठी गीता सुनील पाटील (निपाणी) यांचे अर्ज सोमवारी दाखल झाले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची काल मुदत होती. सकाळी निवडणूक अधिकारी असलेल्या प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया झाली. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ९) किंवा त्यापूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून होणार आहे. अध्यक्षपदासाठी खोत व उपाध्यक्षपदासाठी पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर छाननीसह अन्य प्रक्रिया पार पडली.


















