कर्नाटक : प्रत्येक गावात एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी घडवण्याचा केव्हीके-इनामदार शुगर्सचा निर्धार

बेळगाव : मत्तिकोप्प येथील आयसीएआर-केएलई कृषी विज्ञान केंद्र आणि इनामदार शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बैलहोंगल तालुक्यातील चचडी आणि हिरेबुदनूर येथे आयोजित समग्र ऊस व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी प्रत्येक गावातील २५ प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करून एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मत्तिकोप्प येथील आयसीएआर-केएलई कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मंजुनाथ चौरड्डी यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आणि इनामदार शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सीओ-८६०३२ या ऊस जातीची फाउंडेशन रोपे तयार करून ती थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील खर्च सुमारे ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत उच्च दर्जाची जैविक खते व जैविक कीडनाशके उपलब्ध करून दिली जात आहेत. निवडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना दर १५ दिवसांनी कृषी शास्त्रज्ञ भेट देऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असून, त्यामुळे एकरी १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. इनामदार शुगर्सच्या ऊस विभागाचे व्यवस्थापक बाळप्पा शेगुणशी यांनी कारखान्याने सुरू केलेल्या ‘किसान बाजार’ सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. केएलई कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सौरभ मुनवळी यांनी ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर, त्याचे फायदे आणि आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी नागराज देसाई उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here