कर्नाटक : ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी आज बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

बेळगाव : ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी आणि साखर कारखानदारांमधील संघर्ष अद्याप कायम आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी (ता. ३) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून ऊसदरासह त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. चर्चेतून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

उसाला योग्य दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी कुवेंपूनगर येथील पालकमंत्री जारकीहोळी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी जारकीहोळी यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या.ऊसतोडणीचा हंगाम जवळ आला असून, अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांकडे पाठविण्यासाठी तयार आहे. मात्र, अद्याप ऊसदर निश्चित झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. दर निश्चितीला होत असलेल्या विलंबामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, सरकारने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून योग्य दर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी जारकीहोळी म्हणाले, मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आले असताना ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. त्यावेळी दर निश्चितीबाबत लेखी स्वरूपात माहितीही देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने या विषयावर पुन्हा चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रत्येक संघटनेचे म्हणणे ऐकून घेऊन ऊसदरासह अन्य प्रश्नांवर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here