बेळगाव : यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर द्यावा. ही मागणी मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरला राज्यातील राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत व हसिरू सेनेचे गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगी यांनी दिला. कागवाड नगरपंचायतीच्या पटांगणात आयोजित ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे १० ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत यंदाच्या ऊस दरासंदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. परिषदेत होणाऱ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सीमाभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
यावेळी कर्नाटक राज्य रयत सेनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, शेतकरी नेते राजेंद्र गड्डान्नवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पडसलगी यांनी १२ ऑक्टोबरला दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत ऊस दराचा मुद्दा महत्त्वाचा असेल. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला, ते म्हणाले की, यंदा पाऊस गायब झाल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून २,५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला असला, तरी ही मदत अपुरी आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांचे सर्व बँकांमधील कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने दुष्काळामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करावी. यावेळी अॅड. राहुल कटगेरी, प्रकाश पाटील, राजू पवार यांनी मनोगत व्यक्त केले. काका पाटील, एम. बी. उदगावी, अजित करव, राजू करव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


















