कर्नाटक : प्रतिटन सहा हजार रुपये ऊस दर देऊन कारखाने सुरू करण्याची रयत संघ, हरित सेनेची मागणी

बेळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज्य शेतकरी संघटनेने २९ सप्टेंबर रोजी हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. ऊसदराच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी १२ ऑक्टोबरला दिल्ली येथे बैठकीस बोलावले आहे. तर राज्य रयत संघ आणि हरित सेनेने स्वतंत्रपणे भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत साखर कारखानदारांची बैठक घेऊन उसाला प्रतिटन सहा हजार रुपये दर निश्चित करून गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे साखर कारखाने सुरू करण्याच्या मुद्द्यावर संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राज्य शेतकरी संघटनेने ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत कारखान्यांनी गाळप सुरू करू नये, अशी भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी ऊसतोडणीसाठी आलेल्या टोळ्यांनाही रोखण्यात आले आहे.

ऊसदराचा प्रश्न समान असला, तरी गाळप सुरू करण्याबाबत संघटनांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊसदराचा ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना स्पष्ट दिशा देण्याची मागणी होत आहे. मागणी सारखीच असली, तरी शेतकरी संघटनेच्या नेत्यांबद्दल मतभेदामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य रयत संघ आणि हरित सेनेने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देऊन साखर कारखानदार व मालकांची बैठक बोलावण्याची मागणी केली. या बैठकीत उसाला सहा हजार रुपये प्रतिटन दर निश्चित करून गाळप हंगाम सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चार संघटनांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने नेमका हंगाम कधी सुरू होणार याविषयी संभ्रमाची स्थिती आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here