कर्नाटक : उसाच्या तुऱ्यातून बीज प्रक्रियेद्वारे लागवडीचे संशोधन अंतिम टप्प्यात

बेळगाव : उसाच्या फुलांमधून किंवा तुऱ्यातून बीज काढून त्यापासून ऊस लागवडीचे संशोधन सुरू आहे. हे संशोधन पूर्णत्वास जाताच एक एकरासाठी केवळ १० ग्रॅम बीज पुरेसे ठरणार आहे. या संशोधनाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील चार- पाच वर्षात हे बीज बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती तुकानट्टी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख दत्ता म्हेत्रे यांनी दिली. चिकोडी तालुका पंचायत कृषी विभाग आणि कल्पवृक्ष कृषी संस्थेतर्फे ‘भूमाता संरक्षण, सुरक्षित तणनाशक-कीटकनाशक, बीजोपचार आंदोलन व राष्ट्रीय खतमात्रा संतुलित वापर जागृती अभियान’ या विषयांवर कृषी परिसंवाद झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी निपाणी कृषी संशोधन केंद्राचे संजय पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी हिरवळीची खते, शेणखत व सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवावी. रासायनिक खतांचा अतिवापर टाळला पाहिजे. ऊस पिकाची लागवड करताना कोईमतूर २००४ या वाणाचा प्रयोग करावा. हे वाण साखर उतारा, वजन आणि लवकर तुरा न येण्यासाठी उपयुक्त आहे. रयत संपर्क केंद्र सदलगा येथील कृषी अधिकारी दीपक कौजलगी यांनी मार्गदर्शन केले. दत्ता म्हेत्रे यांनी, रासायनिक खतांचा वापर कमी करून संतुलित खतमात्रा द्यावी. सेंद्रिय खते, जैविक खते आणि मित्र बुरशींचा योग्य वापर केल्यास रासायनिक खतांचा वापर कमी करता येईल. गूळ डाळीचे पीठ आणि ईएम सोल्युशनपासून ट्रायकोडर्मासारख्या बुरशींना उत्तेजन देणे काळाची गरज आहे, असे सांगितले. दीपक कौजलगी यांनी शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण करून वैविध्यपूर्ण पीक पद्धती अवलंबावी एकदल व द्विदल धान्य पिकांचा समावेश करावा. असे आवाहन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here