बेळगाव : साखरेच्या दराने कधी नव्हे तो ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जागतिक तसेच देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव तेजीत असल्याने साखर कारखान्यांचे आर्थिक गणित मक्कम झाले असून आगामी हंगामात उसाला प्रतिटन ऐतिहासिक दर मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारात साखरेची मागणी वाढली असून पुरवठ्यातील तुटवड्यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील तीन ते चार महिने साखरेचे दर असेच चढे राहिल्यास साखर कारखान्यांना मोठा नफा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारखानदारांनी उसाला केवळ एफआरपी न देता, वाढीव दराचा थेट फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा, अशी आक्रमक मागणी आता शेतकरी संघटनांमधून जोर धरु लागली आहे.
उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ, खतांचे वाढलेले भाव आणि मजुरीचा खर्च लक्षात घेता, साखरेच्या या तेजीचा थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळायला हवा. चार महिने बाजारभाव टिकून राहिल्यास कारखान्यांवर उसाला स्पर्धात्मक आणि उच्चांकी दर देण्यासाठी मोठा दबाव निर्माण होईल. साखरेची दरवाढ कायम राहिल्यास कारखाने अंतिम हप्ता किंवा दुसरा हप्ता देताना सढळ हाताने रक्कम जाहीर करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उत्तर कर्नाटक आणि बेळगाव भागातील उसाचा साखर उतारा इतर भागांच्या तुलनेत चांगला असतो. चालू वर्षात साखरेच्या दरात झालेली मोठी वाढ आणि इथेनॉल विक्रीतून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न पाहता ‘महसूल वाटप सूत्रानुसार’ (आरएसएफ) कारखाने नफ्यातील मोठा हिस्सा शेतकऱ्यांना देण्यास सक्षम आहेत. दुसरीकडे, प्रतिकूल हवामानामुळे प्रति-एकरी उसाचे उत्पादन घटले असून खते व मजुरीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे केवळ मूलभूत एफआरपी न देता, उच्चांकी रिकव्हरीचा फायदा देऊन कारखान्यांनी प्रतिटन दर जाहीर करावा, अशी आग्रही मागणी आता शेतकरी संघटना करत आहेत.
केंद्र सरकारने आगामी गाळप हंगामासाठी उसाच्या रास्त आणि वाजवी दर मोबदल्यात वाढ जाहीर करुन पायाभूत एफआरपीचा दर निश्चित केला आहे. मात्र, सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर उच्चांकावर पोचल्याने केवळ पायाभूत एफआरपी देणे कारखानदारांसाठी पुरेसे ठरु शकत नाही. गाळपानंतर मिळणाऱ्या उपउत्पादनांची (इथेनॉल, बगॅस, मोलॅसेस) विक्री आणि साखरेच्या वाढलेल्या दरांमुळे कारखान्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे केवळ केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान एफआरपीचर समाधान न मानता, कारखान्यांनी मिळवलेल्या अतिरिक्त नफ्यातून शेतकऱ्यांना एफआरपीच्या वर ‘अतिरिक्त हप्ता’ देणे आर्थिकदृष्ट्या शक्य आहे.
उतारा आणि महसूल वाटप सूत्र
बेळगावसह उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा दरवर्षी तब्बल ११ ते १२ टक्के असा असतो. उत्तर कर्नाटकातील उच्च रिकव्हरी आणि सध्या बाजारातील साखरेचे चढे दर पाहता उत्पन्नाचा योग्य वाटा शेतकऱ्यांच्या पदरात पाडणे कारखानदारांवर कायद्यानुसार आणि नैतिक दृष्ट्याही बंधनकारक ठरते. आता कारखानदार या दरवाढीचा किती हिस्सा शेतक-यांच्या खिशात घालतात आणि उसाचा दर किती वाढवून देतात, यावरच शेतकरीवर्गाचे आर्थिक भवितव्य अवलंबून असणार आहे.


















