बेळगाव : जिल्ह्यात तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते. बहुतांश शेतकरी ऊस साखर कारखान्यांना पुरवितात. मात्र, काही स्थानिक शेतकरी गुऱ्हाळांमध्ये गूळ तयार करतात. प्रमुख ऊस उत्पादक भागांत नवरात्रीनंतर ते जानेवारीपर्यंत गुऱ्हाळे सुरू असतात. काही ठिकाणी वर्षभर गूळ उत्पादन केले जाते. यंदा साखरेच्या दरवाढीनंतर गुऱ्हाळांमध्ये साखर न घालता तयार केलेल्या गुळाला सध्या ५,८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गणेश चतुर्थी, नवरात्र आणि दिवाळीच्या काळात गुळाची मागणी वाढत असल्याने दरांना आणखी आधार मिळत आहे.
बाजारभावात दररोज दरात बदल होत असल्याचे गूळ उत्पादकांनी सांगितले. येथे वर्षभर गूळ तयार करणारे उत्पादक आपला माल बेळगाव एपीएमसीसह जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच महाराष्ट्रात पाठवितात. साखरेच्या दरवाढीमुळे गुळाच्या मागणीतही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गुळाचा दर सुमारे ५ हजार रुपये क्विंटलहोता. यंदा तो ५ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साखर महागल्याने ग्राहक गुळासारख्या तुलनेने स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत. जिल्ह्यात साखर न घालता तयार केलेल्या गुळाला चांगला भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी सांगितले. घरगुती वापर तसेच पारंपरिक मिठाई, प्रसाद आदींसाठी गुळाचा वापर वाढला आहे.


















