बंगळूर : कर्नाटकातील म्हैसूर, धारवाड, बेळगाव यांसह विविध ठिकाणी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. तसेच शुक्रवारी बंगळूरमधील फ्रीडम पार्क येथे मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ऊसाला राज्य सरकारने स्वतंत्र दर (एसएपी) जाहीर करावा आणि केंद्र सरकारने ऊसाचा उचित व लाभकारी दर (एफआरपी) वाढवावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त व्यासपीठ असलेल्या ऊस उत्पादक समन्वय समितीने हा निर्णय जाहीर केला आहे.
पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाचे प्रदेशाध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.शेतकऱ्यांची मागणी आहे की, राज्य सरकारने ऊसासाठी स्वतंत्र राज्य निर्धारित दर जाहीर करावा. समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारने उसाचा दर प्रतिटन ४,४८० रुपये, उत्तर प्रदेशने ४,२०० रुपये, तर तामिळनाडूने ४,००० रुपये निश्चित केला आहे. याशिवाय, १०.२५ टक्के साखर उताऱ्याच्या आधारे केंद्र सरकारने उसाचा उचित व लाभकारी दर (एफआरपी) वाढवून किमान प्रतिटन ४,५०० रुपये करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सध्याचा दर परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या अन्य प्रमुख मागण्या
ऊस वजन आणि साखर उताऱ्याच्या आकडेवारीत होणाऱ्या कथित गैरप्रकारांवर सरकारने कठोर आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे संपूर्ण कृषी कर्ज माफ करावे आणि यापूर्वीच्या आंदोलनांदरम्यान शेतकऱ्यांवर दाखल केलेले पोलिस गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.उत्तर कर्नाटकातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी प्रतिटन ४,००० रुपये दर जाहीर केला आहे, त्या कारखान्यांना समितीचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी या कारखान्यांना आपला ऊस पुरवठा करू शकतात. दरम्यान, जिल्हास्तरावरील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलनाची रणनीती आखावी, असे आवाहनही समितीने केले आहे.


















