बेळगाव : जमखंडी तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. यात जमखंडी साखर कारखान्याच्या सुमारे ३० कोटी रुपये आणि प्रभुलिंगेश्वर साखर कारखान्याच्या २५ कोटी रुपये ऊस बिलांचासमावेश आहे. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आलगुरजवळ विजापूर-जमखंडी मुख्य रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी प्रांताधिकारी श्वेता बिडीकर व तहसीलदार अनिल बडगेर यांनी भेट घटनास्थळी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. पुढील ८ दिवसांत सर्व थकीत बिले देण्यास संबंधित साखर कारखान्यांनी सहमती दर्शविल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी कारखान्यांनी ऊस बिले थकवल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सरकारने ऊस बिलाच्या देयकासाठी एप्रिलअखेरची मुदत दिली होती. पण, मे महिना संपत आला तरी साखर कारखान्यांनी बिले अदा न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारच्या आदेशानुसार संबंधित साखर कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलन स्थगित केले. पण मुदतीनंतरही आश्वासने पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान, विजापूरकडे जाणाऱ्या बसगाड्या सावळगी, तोदलबागी व चिक्कलकी क्रॉसमार्गे वळविण्यात आल्या होत्या.


















