बेळगाव : हुबळी येथे ऊस दर आणि साखर उद्योगासमोरील अडचणींप्रश्नी २९ सप्टेंबरला झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेत्यांना दिल्लीतील बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार १२ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर दिल्लीतील बैठकीपूर्वी शेतकरी संघटनांनी कठोर भूमिका घेतली आहे. अगोदर ऊस दर जाहीर करण्यात यावा आणि नंतर ही बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने बैठकीचे नियोजन आखलेले असल्यामुळे १२ ऑक्टोबरची बैठक कोणत्या वातावरणात होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
रयत शेतकरी संघटनेचे नेते चन्नाप्पा पुजारी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्ली येथे आयोजित बैठकीपूर्वीच उसाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर करावी. अन्यथा दिल्लीतील बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला आहे. पुजारी म्हणाले की, ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग वाढत आहे. मात्र, साखर कारखानदार या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होत नसल्याचे दिसते. कारखानदारांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पुजारी यांनी केले. ऊसाला योग्य दर मिळाल्यास त्याचा लाभ शेतकरी आणि साखर कारखानदार दोघांनाही होणार आहे. मात्र, सरकारच्या दबावामुळे कारखानदार आंदोलनापासून अलिप्त राहत आहेत असा आरोप पुजारी यांनी केला.


















