कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) आगामी वतीने गळीत हंगामाकरिता तोडणी वाहतूकदारांना ॲडव्हान्स रकमेचे वाटप करण्यात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कारखान्याला याकरिता अर्थसहाय्य उपलब्ध झाले आहे. सध्या कारखान्याकडून नियमित ओव्हरहॉलिंगची कामे वेगाने सुरू आहेत. गळीत हंगाम २०२६-२७करिता १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखाना गळितासाठी सज्ज ठेवण्याचे नियोजन केले आहे. डिस्टीलरी प्लॅट नूतनीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे.
कारखाना व्यवस्थापनाने येत्या गळीत हंगामामध्ये ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, ५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्याचे ठरविले आहे. गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी तोडणी-वाहतूक प्रतिनिधी व कारखाना कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. ऊस बागायतदारांनी उसाच्या नोंदी वेळेत कराव्यात, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले.

















