कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात झाली. यावेळी अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष अनिल फडके यांच्यासह संचालक उपस्थित होते. सभेत कारखान्याच्यावतीने गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १०० रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा अध्यक्ष मुकूंद देसाई यांनी केली. तसेच कर्मचारी वर्गाला ८.३३ टक्के बोन दिवाळीपूर्वी दिला जाईल आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी टप्प्याटप्याने दिली जातील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सभेत माजी अध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्यासह विरोधकांनी कारखान्याच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्याला मुकुंद देसाई, संभाजी सावंत, प्रकाश चव्हाण यांनी उत्तरे दिली.
माजी अध्यक्ष शिंत्रे म्हणाले की, दरवर्षी २ ते ३ कोटी रुपयांमध्ये होणारे ओव्हरहोलिंगचे काम चालू वर्षी २५ कोटी रुपये झाले आहे. यामुळे पुन्हा कारखाना तोट्यात जाईल. तानाजी देसाई यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ४०० रुपये मिळालेच पाहिजेत, अशी मागणी केली. उसाचे गाळप कमी असताना नफा व जास्त गाळपानंतर तोटा कसा झाला, असा प्रश्न सुनील शिंदे यांनी केला. ताळेबंद बोगस असल्याची टीका इंद्रजीत देसाई यांनी केली. संजय देसाई, सचिन पावले यांनीही चर्चेत भाग घेतला.
यावेळी उपाध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत केले. रणजीत देसाई यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. अनिल देसाई यांनी इतिवृत्त वाचन केले. संचालक राजेंद्र मुरुकटे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष अनिल फडके, संचालक वसंतराव धुरे, विष्णू केसरकर, मधुकर देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, रचना होलम, मनीषा देसाई, काशिनाथ तेली, कार्यकारी संचालक संभाजी सावंत उपस्थित होते.


















