कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नुकताच झाला. संचालक संतोष पोर्लेकर व त्यांच्या पत्नी सुनीता पोर्लेकर या उभयतांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. या कार्यक्रमप्रसंगी केंद्र सरकारने साखरेचा दर प्रतिक्विंटल ५,००० रुपये करावा आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा अशी मागणी करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी, भोगावती कारखान्याने गेल्या हंगामात उच्चांकी ऊसदर दिला आहे. येत्या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यात आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष पाटील म्हणाले की, यंदा दुष्काळाचे सावट आहे. देशात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, साखर कारखान्यांसमोरही अडचणी निर्माण होऊ शकतात. उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील, सचिव बाजीराव पाटील, शिवाजी डोंगळे, शशिकांत पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते. कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी आभार मानले.


















