कोल्हापूर : दौलत-अथर्व साखर कारखाना कामगार संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २ ते १२ एप्रिल यादरम्यान अकरा दिवस उपोषण केले होते. त्यांच्यातील वादावर अद्याप ठोस तोडगा निघाला नाही. गुरुवारी कोल्हापूर येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त विजय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीला अथर्व-दौलत प्रशासनाकडून सीईओ विजय मराठे, गणेश फाटक व अन्य अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्यावतीने चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष आबासाहेब चौगुले, ज्येष्ठ मार्गदर्शक कॉ. उदय नारकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे उपस्थित होते.
बैठकीत साखर कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार, सचिव अशोक गावडे, सहसचिव महादेव पाठक, चंद्रकांत गावडे यांनी अत्यावश्यक सेवेतील ३३ कामगारांचे निलंबन करण्यात आले आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी केली. नितीन पाटील म्हणाले, कामगारांचे पगार थांबल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शेतकरी कुटुंबांची मोठी ओढाताण होत आहे. हा निर्णय योग्य नाही असे सांगितले. सहायक कामगार आयुक्तांनी प्रशासनाला सूचना केल्या. यादरम्यान कारखाना अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील दाखल केलेल्या तक्रारी मागे घ्या, अशी मागणी अथर्व प्रशासनाने केली. याबाबत नारकर, आबासाहेब चौगुले यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यावर सहायक कामगार आयुक्त विजय घोडके यांनी पुढील चर्चेसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता आपल्या कार्यालयात बैठकीचे नियोजन केले आहे.


















