कोल्हापूर : आजरा तालुक्यातील एरंडोळ परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण आहे. हत्तीने रात्री मारुती पाटील यांचा चिखल करण्यासाठी आणलेला पॉवर टिलर शेताच्या कोपऱ्यात नेऊन टाकला. त्याशिवाय, चाळोबा गणेश हत्तीने ऊस पिकाचे, नारळ व तरव्याचे नुकसान केले. मारुती पाटील यांच्या शेतातील नारळाचे झाडही हत्तीने उपसून टाकले आहे. वनविभागाच्या पथकाने ड्रोनच्या साहाय्याने हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावले.
स्थानिकांनी सांगितले की, सुरुवातीला हत्ती पॉवर टिलरबरोबर फुटबॉलसारखे खेळला. त्यानंतर त्याने तो रागाने उलथवून टाकला. यादरम्यान, हत्तीने शिवाजी सुपल व पांडुरंग उपळकर यांचे तरवा तुडवून नुकसान केले. निवृत्ती पाटील यांच्या उसाच्या शेतात हत्ती फिरल्याने नुकसान झाले आहे. वन विभागाच्या पथकाकडून ड्रोनच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी हत्तीला जंगलात हुसकावून लावण्यात आले. रात्री उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. शुक्रवारी वनपाल संदीप शिंदे, वनरक्षक सुरेखा चाळके व वनसेवक शंकर डवरी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले आणि मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.


















