कोल्हापूर : गुजरातमध्ये अन्न व औषध प्रशासनाने एक किलोच्या रव्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सिंथेटिक रंग असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई केली. प्रयोगशाळेत तपासणी करूनच गूळ पाठवा, असा फतवा गुजरात येथील गूळ खरेदी असोसिएशनने काढल्याने येथील खरेदीदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे रंगविरहित गूळ तयार करा, असा आग्रह खरेदीदारांचा आहे, त्यानुसार दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने रंगविरहित गूळ सौद्याला आणला. यावेळी इतर गुळाला ४७ रुपये किलोला भाव मिळाला, पण रंगविरहित गूळ ४१ रुपयांनी मागितला. किलो मागे ६ रुपयांचा तोटा करून गूळ विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने संबंधित शेतकऱ्याने परत नेला.
दरम्यान, गुजरातमध्ये सिंथेटीक रंग सापडलेला गूळ हा रायबाग येथून खरेदी केलेला होता, असा दावा बाजार समितीचा आहे. मग, कोल्हापूरचा गूळ बदनाम का करता, असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत. तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत नियमानुसार बिगर रंगाच्या गुळाला ४१ रुपये, तर रंग मिसळलेल्या गुळाला ४७ रुपये दर मिळतो. शेतकऱ्यांना प्रती किलो ६ रुपयांचा तोटा करून गूळ विक्री करणे परवडत नसल्याने संबंधित शेतकऱ्याने परत नेला. तर गुजरातमध्ये सिंथेटीक रंग सापडलेल्या गूळ खरेदीदाराला बाजार समितीने नोटीस काढून खुलासा मागितला आहे. कोल्हापूरचा शेतकरी साखर वापरून गूळ तयार करत नव्हता. पण कर्नाटकातून साखर व रंगमिश्रित आकर्षक गूळ आल्याने खरेदीदारांनीच येथील शेतकऱ्यांना साखर व रंगाची सवय लावल्याचे शेतकरी सांगत आहेत.


















