कोल्हापूर : १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू केल्यास साखर उताऱ्यासह उत्पादनही घटण्याची शेतकऱ्यांना भीती

कोल्हापूर : बाजारातील साखरेचा तुटवडा आणि त्यामुळे साखर दरात झालेली वाढ यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत यावर्षीचा साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. साधारणपणे १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात उसाचा उतारा ८ ते ९ टक्के असतो. डिसेंबरनंतर थंडी असते. त्यानंतरच उतारा वाढण्याची संधी असते; पण, ऑक्टोबर महिन्यातच कारखाने सुरू झाले तर कमी रिकव्हरीच्या किमान ५० ते ६० टक्के उसाचे गाळप झालेले असेल. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत उसाचा उतारा चांगला असतो; पण, हंगाम जानेवारीच्या अखेरीस संपेल. उसाचा उतारा वाढायला संधीच मिळणार नाही. त्यामुळे साखर उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती आहे.

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासूनच सुरू करण्याच्या मंत्री समितीच्या निर्णयास साखर उद्योगासह संघटनांनी विरोध केला आहे. यापूर्वीच ‘विस्मा’सह शेतकरी संघटनांनी हंगाम १ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात या मागणीकडे दुर्लक्ष करून निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी मे आणि जून महिन्यांतच जास्त पाऊस झाला. त्यानंतर ऊस लागवडीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. परिणामी, सध्या उपलब्ध उसापैकी ६० टक्के ऊस हा खोडवा आहे. खोडवा ऊस हा १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा आहे. उर्वरित ४० टक्के उसाची लागवड उशिरा झाल्याने तो पक्व होण्यास किमान डिसेंबर ते जानेवारी महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल. साखर कारखाने लवकर सुरू झाले तर साखर उतारा घटणार आहे. उतारा घटला तर शेतकऱ्यांनाही आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. त्याशिवाय राज्यात किमान १५ ते २० लाख टन साखर उत्पादनही घटण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here