कोल्हापूर: सध्या सगळीकडे ‘शेती वाचवा’ अभियान सुरू असताना श्री दत्त साखर कारखान्याने राबवलेला ‘दत्त पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित शेतकरी मेळावा, क्षारपड जमीन सुधारणा यशोगाथा आणि गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस पीक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी ऊस पिक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. आडसाली ऊस गटात आण्णासो पाटील (माले), जंबूकुमार चौगुले (साजणी), सुभाष पाटील (शिरगुपी). उत्तेजनार्थ: भाऊसो पसारे (कारदगा), लक्ष्मण पसारे (कारदगा), महादेव कुलकर्णी (कुन्नूर) तसेच पूर्वहंगामी ऊस : दादासो गतारे (शिरटी) आणि खोडवा ऊस : श्रीपाद शेरीकर (माणगाव) हे विजेते ठरले. त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ‘व्हीएसआय’चे पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व, माती परीक्षण, सेंद्रिय कर्बवाढ, अन्नद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन तसेच पाणी, खते, कीटकनाशकांच्या शास्त्रशुद्ध वापराबाबत मार्गदर्शन केले. कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड यांनी ‘क्षारपड जमीन सुधारणा : दत्त पॅटर्न’ या विषयावर माहिती दिली. कर्नाल येथील ऊस संशोधन केंद्राचे डॉ. डी. एस. बुंदेला यांनी ‘कृत्रिम निचरा प्रणाली तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना क्षारपड जमिनीची कारणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, शेतकरी संस्थांमार्फत जनजागृती आणि प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी पारंपरिक शेतीबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून तरुणांना शेतीकडे वळवण्याची गरज आहे असे सांगण्यात आले. कार्यक्रमात सत्पाल खोंद्रे, जंबूकुमार चौगुले, रावसो विठ्ठठाण्णा आणि अश्विनी शेरीकर यांची भाषणे झाली. शेतीमित्र पुरस्कारप्राप्त प्रवीण माळी यांचा विशेष सत्कार केला. अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक आदी उपस्थित होते. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी आभार मानले.


















