कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने सन २०२५-२६ या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसासाठी अंतिम हप्ता म्हणून प्रतिटन १०० रुपये शेतकन्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली. श्रावण महिना, श्री गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकन्यांना हे पैसे उपलब्ध व्हावेत, या भावनेतून अंतिम हप्ता जमा करण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. मंगळवार, दि. १ सप्टेबरपासून शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यातून ही रक्कम उचलावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, सन २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ठरलेल्या तोडग्यानुसार ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४०० रुपये पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यानंतर १०० रुपये अंतिम हप्ता, असे एकूण प्रतिटन ३,५०० रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. कारखान्याने ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. आगामी हंगामात १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.


















