कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू असल्याने ऊस पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा वाहत असल्याने ऊस पीक आडवे होऊ लागले आहे. ऊस पडल्याने आगामी तीन-चार महिने त्याची वाढ खुंटणार आहे. परिणामी वजनाला फटका बसणार आहे. यंदा जून महिन्यात ११३ मिलीमीटर पाऊस झाला. पण गेल्या पाच दिवसात तब्बल १५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच जोरदार वारे वाहात असल्याने त्याचा फटका ऊस पिकाला बसत असल्याचे दिसून आले आहे.
यंदा जानेवारीपासून तापमानात वाढ सुरू झाली होती, त्यामुळे पिकांच्या पाण्याची भूक वाढली होती. त्यात, जून अखेर मान्सून लांबल्याने पाणीटंचाईचा फटका उसाला बसला. पुरेसे पाणी न मिळाल्याने उसाची मुळे कमकुवत राहिली आणि वाढ खुंटली. उन्हाळ्यात पाण्याची ओढ बसल्याने उसाच्या मुळांची वाढ अपेक्षित झाली नाही, जूनअखेर पावसाने ओढ दिली होती. गेल्या पाच-सहा दिवसांपासून एकदम दमदार पाऊस कोसळत आहे. वाऱ्याचाही धडााका असल्याने अनेक ठिकाणी उभे ऊस आडवे झाले आहेत. पहिल्याच पावसात उसाची पडझड सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. याबाबत सांगरुळचे शेतकरी अशोक नाळे म्हणाले की, उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करत ऊस वाढवला आणि आता पहिल्याच पावसात जमिनीवर कोसळला. या उसाचा पुढे चार-पाच महिने सांभाळ कसा करायचा, हा खरा प्रश्न आहे.


















