कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या उसाला ४५०० रुपये एफआरपी मिळावी आणि साखर कारखानदारांना २० रुपये एमएसपी वाढ मिळावी या मागणीसाठी पदवीधर मित्र माणिक पाटील-चुयेकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांसाठी पाटील-चुयेकर हे आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनस्थळी प्रादेशिक साखर-उपसंचालक युसूफ शेख यांनी भेट दिली. त्यांनी विविध मागण्यांबाबत चुयेकर यांच्याशी चर्चा केली. जिल्हा प्रशासनामार्फत करवीर तहसीलदार यांच्या आदेशाने साखर उपसंचालकांनी चुयेकर यांची भेट घेतली. मागण्या शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्र सरकारने उसाची एफआरपी प्रतिटन ४५०० रुपये करावी, त्याचवेळी साखरेच्या विक्री दरात (एमएसपी) प्रतिकिलो २० रुपयांची वाढ केली जावी तर त्याचा फायदा साखर उद्योगाला होऊ शकतो असे चुयेकर यांची मागणी आहे. या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी पदवीधर मित्र माणिक पाटील-चुयेकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शेतकरी सेनाप्रमुख प्रा. जालंदर पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक केरबा भाऊ पाटील, कार्यकारी संचालक सागर पाटील, माजी संचालक डी. आय. पाटील, बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास साहेकर यांच्यासह परिसरातील संस्थांचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.


















