कोल्हापूर : ऊसदराचा तिढा कायम; शिरोळ, हातकणंगलेतील पाच कारखान्यांची धुराडी बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात उसाची उपलब्धता कमी असताना बाजारपेठेत साखरेचे दर वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष अद्याप कायम असल्याने शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांची धुराडी अद्याप पेटलेली नाहीत. आंदोलक शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार दर देणे सध्या तांत्रिक अडचणींमुळे शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांसमोरही पेच निर्माण झाला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला असला, तरी पूर्व भागातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील पाच कारखाने अद्याप बंद आहेत. या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश या संघटनांनी ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखानदारांनीही सावध भूमिका घेतली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्ह्यात प्रतिटन ३,८०० ते ४,००० रुपये दरावर तोडगा काढण्यासाठी साखर कारखानदार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. साखरेच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेच्या आधारे कारखानदार देऊ करत असलेला दर आणि आंदोलक संघटनांची मागणी यामध्ये सुमारे ५०० रुपयांची तफावत आहे. गेल्या वर्षी आंदोलक संघटनांमध्ये तडजोडीच्या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. यंदाही तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कारखानदार सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कारखान्यांची ऊसतोड यंत्रणा सज्ज

हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील पाचही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ऊसतोडणीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ऊसतोड मजूर कारखाना कार्यस्थळावर तसेच संबंधित कार्यक्षेत्रात दाखल झाले आहेत. मात्र, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागण्याची प्रतीक्षा ऊसतोड मजूर आणि वाहनधारक करीत आहेत. ऊसदराचा तिढा लवकर सुटून गळीत हंगाम सुरू व्हावा, अशी अपेक्षा कारखानदारांसह ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांकडून व्यक्त होत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here